नवी दिल्ली(वृत्तसंस्था): युक्रेनला अतिरीक्त लष्करी मदत म्हणून संहारक क्लस्टर बाँम्बसाठा पुरवला जाणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. या संहारक शस्त्रसाठ्यावर अमेरिकेच्या प्रमुख मित्रदेशांसह इतर १०० पेक्षा जास्त देशांनी बंदी घातली असल्यानं, हा शस्त्रसाठा दिला जावा की नाही, यासंदर्भात बायडेन प्रशासनानं दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हॅन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अमेरिकेने युक्रेनला असा संहारक शस्त्रसाठा पुरवू नये, तसंच रशिया आणि युक्रेननं देखील परस्परांविरोधात अशा शस्त्रांचा वापर करू नये असं आवाहन मानवी हक्क संघटनांनी केलं आहे. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालयानं एक निवेदनही जारी केलं आहे. यामुळे सामान्य नागरीकांना मोठं नुकसान पोहचेल असं या निवेदनात म्हटलं आहे.