मुंबई :‘आरसीएफ’ कंपनीने भरतीप्रक्रिया राबवताना न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथील दालनात थळ येथील ‘आरसीएफ’ कंपनीच्या विस्तार प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, ‘आरसीएफ’ कंपनीचे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,’आरसीएफ’ कंपनीने भरतीप्रक्रियेसंदर्भात स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल याची प्राधान्याने दक्षता घ्यावी. विस्तारीकरण करताना स्थानिकांबाबत सौहार्दाची भूमिका घ्यावी असे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाकडून यासंदर्भात मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याचे ‘आरसीएफ’ च्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. त्यावर हे मार्गदर्शन येईपर्यंत भरतीप्रक्रिया स्थगित ठेवावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत व आमदार महेंद्र दळवी यांनीही स्थानिकांना प्राधान्य देण्यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या.