मुंबई: सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार म्हणजे देशाला प्रेरणा देणारा ऐतिहासिक वारसा आहे. एकमेकांच्या विचारांचा आदर, एकमेकांप्रती संवेदनशीलता जपत तितक्याच ताकदीने विचारांची स्पष्ट मांडणी करणारा हा पत्रव्यवहार सर्वांना उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र दर्शनिका विभागाने (गॅझेटिअर) सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला पत्रव्यवहार ग्रंथरुपाने संपादित केला आहे. त्याचे प्रकाशन आज मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. आमदार डॉ. पंकज भोयर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर यावेळी उपस्थित होते. दर्शनिका विभागाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आज या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशाच्या इतिहासात सरदार पटेल यांच्या बद्दलचा आदर चिरंजीव राहणार आहे. देशातील 565 संस्थाने त्यांनी विलीनीकरण केले आणि कणखरपणा दाखवून दिला. देशाच्या एकात्मता आणि अखंडतेत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. गॅझेटिअर विभागाने महात्मा गांधीजी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील पत्रव्यवहार प्रकाशित केला आहे. मोठ्या नेत्यातील संवादाची भाषा कशी होती हे या पत्रव्यवहारातून कळून येते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
ते म्हणाले की, महात्मा गांधींनी या पत्रव्यवहारातून सत्य आणि अहिंसा यापासून डगमगू नका, असा संदेश दिला आहे. अहिंसा हा जगाने मान्यता दिलेला विचार आहे. मतभेदही किती संवेदनशीलपणे मांडता येतात, एकमेकांप्रती आदर याविषयी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यातील पत्रव्यवहारातून स्पष्ट होते. कोणतीही भूमिका ही तर्कसंगत पद्धतीने मांडली गेली पाहिजे. भावनेवर नाही तर भविष्याचा वेध घेत त्याचे नियोजन करत पुढे जायला हवे हे त्याकाळात या पत्रव्यवहारातून दिसून येते. या ग्रंथाद्वारे हा पत्रव्यवहार सर्वांसाठी उपलब्ध झाल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
दर्शनिका विभागाने यापुढील काळातही अशा प्रकारचा ऐतिहासिक वारसा अभ्यासासाठी सर्वांना उपलब्ध व्हावा, यासाठी कार्यरत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.