सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट
पुणे : सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव व शिरुर तालुक्यात काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपान भाकरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
श्री. वळसे-पाटील म्हणाले, आंबेगाव व शिरुर तालुक्यात काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असल्यामुळे संबंधित यंत्रणेने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करुन जिल्हा प्रशासनाकडे सादर करावे. शेतकऱ्यांना सामुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात येईल. शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे श्री. वळसे पाटील म्हणाले.
यावेळी श्री. वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी (सातगाव पठार), जारकरवाडी, धामणी, लोणी, वडगावपीर, वाळूंजनगर, रानमळा, खडकवाडी, पोंदेवाडी आणि शिरुर तालुक्यातील वडनेर, सविंदणे, कवठे येमाई, मलठण, माळवाडी, म्हसे,निमगाव दुडे व टाकळी हाजी परिसरातील होणेवाडी, साबळेवाडी, शिनगरवाडी, ऊचाळेवस्ती, डोंगरगण तामखरवाडी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.