पुणे : “मराठी माझी मातृभाषा आहे. पण संस्कृत ही प्राचीन भाषा असं म्हणतात. सर्व भाषेचा उगम संस्कृत भाषेत आहे. मी विधानसभेत निवडून गेलो तेव्हा संस्कृतमधून शपथ घेतली होती. ती दिसायला अवघड आहे. पण ती अत्यंत सोपी भाषा आहे. मी लोकसभेतील शपथ संस्कृतमध्ये घेणार”, असं भाजपचे नवनिर्वाचित पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितलं. सोशल मीडियावर सध्या महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी अशी मोहिम सुरु आहे. त्याबाबत गिरीश बापट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
गिरीश बापट हे सध्या महाराष्ट्रात अन्न पुरवठा तसेच संसदीय कार्यमंत्रीपद सांभाळत आहेत. मात्र पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यामुळे आता त्यांना दिल्लीला जावं लागणार आहे.
त्याबाबत बापट म्हणाले, “अनुभव आगळा वेगळाच आहे. अनेक वर्षे राज्यात काम केलं. आता लोकसभेत काम करायचे आहे. विशेषतः मी असं ठरवलं आहे राज्याला आणि पुण्याला केंद्रांकडून मिळणारा निधी त्याचा अभ्यास करायचा. महाराष्ट्रात आणि पुण्यात गतीने विकासाची कामे होत आहेत. जितका अधिक निधी मिळेल तेवढी लवकर कामे पूर्ण करू शकू. विकास कामासाठी निधी आवश्यक आहे. त्यामुळे पहिले प्राधान्य विकासकामांनाच असेल.”