मुंबई : महानगरपालिकांच्या शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी या शाळांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. विधानभवन येथे विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. पटोले बोलत होते.

श्री. पटोले म्हणाले, राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासह ज्या शाळांनी आपला आदर्श निर्माण केला आहे. अशा शाळांमध्ये विद्यार्थी-शिक्षकांच्या भेटीचे आयोजन करण्यात यावे. दर्जा सुधारण्यासाठी याचा निश्चित फायदा होईल. यावेळी नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेतील विविध विषयांचा आढावा

नागपूर महानगरपालिकेतील विविध विषयांवर यावेळी बैठक झाली. विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले म्हणाले, नागपूर महानगरपालिकेने कररचनेमध्ये कालानुरुप सुसंगत बदल करावेत. यावेळी नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी प्रवीण सोनारे उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध विषयांचा आढावा

ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांच्या सेवांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनात ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांची सेवा कायम करावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

तलाव क्षेत्रासंदर्भात आढावा

राज्यातील तलाव क्षेत्र धोरणाबाबत आयोजित बैठकीमध्ये मच्छिमारांच्या अडचणी दूर करून नवीन सुधारणा करीत योजना आखण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिल्या.

ऑटोरिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांबाबत…

यावेळी राज्यातील ऑटो रिक्षाचालकांच्या विविध समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. बेरोजगारी दूर करणे, ऑटोरिक्षाचालकांचे परमिटबाबत, लोकांची गैरसोय टाळून चांगली सुविधा उपलब्ध करुन देणे, ऑटोरिक्षा अपघात, प्रदूषण टाळणे याबाबत चर्चा झाली. ऑटोरिक्षा चालकांचे विविध मुद्यासंदर्भात कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अपर प.रि.आयुक्त स.बा. सहस्त्रबुद्धे, उपसचिव प्रकाश साबळे, कामगार उपसचिव डॉ.श्रीकांत ल. पुलकुंडवार तसेच ऑटोरिक्षा मालक संघटना संयुक्त कृती समितीचे (महाराष्ट्र) चे अध्यक्ष शशांक राव, महासचिव बाबा कांबळे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.