नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धचा चौथा टी-ट्वेंटी सामनाही सूपर ओव्हरच्या उत्कंठावर्धक लढतीत भारतानं जिंकला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणा-या न्यूझीलंड विरोधात भारतानं 165 धावा फटकावल्या. त्यात मनिष पांडेच्या अर्धशतकाचं तसंच लोकेश राहुलच्या झंझावाती 39 धावांचं मोठं योगदान होतं.

166 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघही 165 धावा करु शकला. कोलीन मंद्रो आणि यष्टीरक्षक टीमच्या अर्धशतकांची झुंजार खेळी यात महत्त्वपूर्ण ठरली. मात्र सलग दुसरा सामना सूपर ओव्हरच्या कोर्टात गेल्यानं क्रिकेट रसिकांना आगळीच मेजवानी मिळाली. सूपरओव्हरमधे न्यूझालंडनं 13 धावा केल्या.

भारताकडून लोकेश राहुलनं पहिल्या चेंडूवर षटकार, तर दुस-या चेंडूवर चौकार मारुन सामना जवळपास संपवलाच होता. मात्र तिस-या चेंडूवर राहुल झेलबाद झाल्यानं, सामन्यात पून्हा रंगत आली. कर्णधार विराट कोहलीनं मात्र कोणताही ताण न घेता चौथ्या चेंडूवर दोन धावा, तर पाचव्या चेंडूवर चौकार फटकावत एक चेंडू राखूनच सामना खिशात घातला. अशा प्रकारे पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी निर्भेळ आघाडी घेतली आहे.