मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

पुणे : जिल्हाधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करुन  मतदार पडताळणी कार्यक्रमाचे जिल्ह्यांचे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिले.

भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 11 नोव्हेंबर 2019 ते 13 फेब्रुवारी 2020 या कालावधीत मतदार पडताळणी कार्यक्रम राज्यात सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बलदेव सिंग  यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय स्तरावरील बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.  बैठकीला राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर चे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, दौलत देसाई, डॉ. अभिजित चौधरी, मिलिंद शंभरकर, सातारा चे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण तसेच विभागातील सर्व जिल्ह्यांचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

श्री. सिंग म्हणाले, मतदार नोंदणी झालेल्या सर्व मतदारांची पडताळणी 13 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. या कामात मागे असणाऱ्या जिल्ह्यांनी पुरेशा मनुष्यबळाचा वापर करून निर्धारीत वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा या कामातील सहभाग वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीने बैठका घेऊन संबंधित विभागाला योग्य ते निर्देश द्यावेत. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवून काम करावे. राजकीय पक्षांच्या बैठका घेऊन पक्ष निहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता यांच्या नियुक्तीचे प्रमाण वाढवावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दिलीप शिंदे म्हणाले, हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी. पुणे विभागातील जिल्ह्यांचे मतदार पडताळणी कार्यक्रमाचे काम विहित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी बैठकीत व्यक्त केला.

या कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर झालेल्या कामाची माहिती सर्व जिल्हाधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची उपलब्धता, त्यांचे प्रशिक्षण, निवडणूक विषयक प्रलंबित प्रकरणे, प्राप्त अर्जांवर करण्यात आलेली कार्यवाही, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट साठवणुकीसाठीच्या गोडावूनची उपलब्धता, निवडणूक विषयक प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे, स्वीप कार्यक्रम व राष्ट्रीय मतदार दिनांतर्गत संबंधित जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी  नवल किशोर राम, दौलत देसाई, डॉ. अभिजित चौधरी, मिलिंद शंभरकर व अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली.