नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी, देशातल्या बाजारपेठांचं अर्थकारण सुरु ठेवणाऱ्या अदृष्य घटकांना सक्षम करावं लागेल, याचे सुतोवाच आज संसदेत मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालानं दिले असल्याचं भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमणिअन यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते.

जगातल्या अनेक देशांप्रमाणेच भारताला जागतिक आर्थव्यस्थेतल्या मंदीचा फटका बसला असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतातल्या बँकीग क्षेत्राचं मूल्य देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुल्याइतकं असायला हवं, आणि त्यादृष्टीनंच बँकीग क्षेत्रातून प्रयत्न व्हायला हवेत असं त्यांनी सांगितलं.