मुंबई : अनुज्ञप्ती तसेच अन्य नियमावलीसंदर्भात मागणी आणि सूचना यांचा अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. चेंबर ऑफ कॉमर्सच्या, आयएमसी इमारत येथे झालेल्या बैठकीत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष वैद्य, पूर्व अध्यक्ष मानिक रूपानी, महासंचालक अजित मंगरूळकर आदी उद्योजक सदस्य उपस्थित होते.
यावेळी उद्योजकांच्या मागणीवजा प्रश्नांना उत्तर देताना वळसे पाटील म्हणाले, खाजगी जागेत मद्य सेवनाकरिता कोणत्याही अनुज्ञप्तीची आवश्यकता नाही. खाजगी जागेत होणाऱ्या समारंभांना अनुज्ञप्ती आवश्यक नसली तरी सार्वजनिक जागेत होणाऱ्या समारंभाना ती आवश्यक आहे. खाजगी परवाना मिळण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. मात्र, खाजगिरीत्या मद्यसेवन करण्यासाठी खाजगी वापर परवाना घेणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मद्य सेवन करणाऱ्या प्रत्येकाकडे ते असणे आवश्यक ठरते. मद्य सेवनाबद्दल असणाऱ्या अटी घरात असलेल्या लोकांच्या संख्येवर अवलंबून नसून मद्य साठा करण्यासाठी त्या बंधनकारक आहेत. तसेच, मद्य साठा तपासणी करताना कोणासही वैयक्तिकरित्या हानी पोहोचवली जाऊ नये यासाठी योग्य ती काळजी व सतर्कता घेण्याची सूचना विभागाला दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.