पुणे : ‘पीएम किसान’ योजनेअंतर्गत किसान कार्ड (पिक कर्ज) घेतले नसलेल्या शेतकऱ्यांना बँकिंग क्षेत्राकडून पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

या शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने अर्ज दाखल करता यावा, यासाठी आयबीए संस्थेमार्फत एक पानी अर्जाचा नमुना बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसल्याबाबतचे घोषणपत्र घेवून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेल्या बँकेमध्ये संपर्क साधावा. कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्थेमध्ये पिक कर्ज नसणाऱ्या पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस च्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. आवश्‍यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बँकेमार्फत  किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजने अंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पिक कर्ज घेतलेले नसलेल्या लाभार्थी शेतकर्‍यांनी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राम यांनी केले आहे.

तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी गाव पातळीवर विशेष मोहीम राबवून संबंधित कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.