मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्ग्याचे नूतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज येथे दिले.

हाजी अली दर्गा नूतनीकरण व सौंदर्यीकरणासंदर्भात आज मंत्रालयात श्री. शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी दर्ग्याच्या नूतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले.

श्री. शेख म्हणाले, हाजी अली दर्गा येथे दररोज देशविदेशातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. हे एक महत्त्वाचे धार्मिक तसेच पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे या परिसराचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व परवाने तातडीने घेण्यात यावेत. तसेच सौंदर्यीकरणात बाधा येणारे या परिसरातील अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याचीही कार्यवाही तातडीने करावी.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सह पोलीस आयुक्त नवल बजाज, मुंबई मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन., हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त मसूद हसम दादा, रिझवान मर्चंट, सुहेल खांडवानी, जफर शेख आदी यावेळी उपस्थित होते.

असे असेल सौंदर्यीकरण…

  • मुख्य रस्त्यावर भव्यदिव्य बुलंद दरवाजा उभारणार
  • विविध फुलांची झाडे असलेल्या मुघल गार्डनची निर्मिती
  • मुघल गार्डनमध्ये प्राचीन काळाची आठवण करून देणारे बाकडे, लाईट यांची व्यवस्था
  • भाविकांसाठी विशेष सोयीसुविधासाठी ‘व्हिजिटर प्लाझा’
  • मुख्य रस्ता ते दर्गा या मार्गाचे नूतनीकरण करून सुंदर रस्ता होणार
  • दर्ग्याचे मुख्य दरवाजाचे सौंदर्यीकरण