मुंबई : नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिक येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्याबाबतची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी श्री. भुजबळ बोलत होते.

श्री. भुजबळ म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या धोरणानुसार नाशिक येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात सुरु करण्यात येईल. त्याकरिता नाशिक येथील जिल्हा सामान्य रुग्णालय संलग्नित करणे आवश्यक असून वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात 3 वर्षासाठी रुग्णालय हस्तांतरण करार करण्यात येईल. या शासकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर हे दोन्ही अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरु करण्यात येतील.

आयुर्वेद, होमिओपॅथी व फिजिओथेरेपी हे अभ्यासक्रम आरोग्य विद्यापीठामार्फत सुरु करण्यात येतील. शासकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार असल्याचेही श्री.भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर तसेच वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.