जेरुसलेम-मुंबई महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि जेरुसलेमच्या महापौरांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : इस्राईल आणि महाराष्ट्राचे घनिष्ठ संबंध आहेत. हे संबंध येणाऱ्या काळात अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी ठाणे, रायगड आणि मुंबई येथे ज्युईश वारसा स्थळे विकसित करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली. ज्युईश वारसा स्थळांमुळे इस्राईल, संयुक्त राष्ट्र तसेच जगातील सर्व पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे जेरुसलेम-मुंबई महोत्सवाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेरुसलेमचे महापौर मोशे लियोन यांच्यासह इस्त्राईलचे मुंबईचे कौन्सलेट जनरल याकोव्ह फिन्केस्टिन, जेरुसलेम येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक विभाग आणि जेरुसलेम महानगरपालिका यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवास भारतातील इस्त्राईल वाणिज्य दूतावास, भारत-इस्त्राईल चेंबर ऑफ कॉमर्स फेडरेशन, जेरुसलेम महानगरपालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख यावेळी म्हणाले,आशियात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या जेरुसलेम महोत्सवाचे यजमानपद मुंबईला मिळणे हा महाराष्ट्राचा गौरव आहे. जेरुसलेम- मुंबई महोत्सवामुळे महाराष्ट्र आणि इस्त्राईल देशामधील आंतरराष्ट्रीय संबंध आणि सांस्कृतिक देवाण घेवाण अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. या महोत्सवामुळे इस्त्राईल-जेरुसलेमचे वैभव मुंबईला समजण्यास मदत होणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना जेरुसलेमचे सांस्कृतिक दर्शन होण्यास मदत होणार आहे. या महोत्सवामुळे कलात्मक आणि सांस्कृतिक संबधांना प्रोत्साहन मिळणार आहे.

श्री.देशमुख म्हणाले, भारत आणि जेरुसलेमला प्राचीन सभ्य संस्कृती लाभली असून आज हे एक आधुनिक राष्ट्र म्हणून प्रस्थापित आहे. भारताप्रमाणे जेरुसलेमध्ये देखील शेती,पाणी,वाहतूक,शिक्षण यांसारखी आव्हाने आहेत. महाराष्ट्रात पूर्वी ज्युईश राहायचे. महाराष्ट्रात ते तेलाचा व्यवसाय करत असल्यामुळे आणि शनिवारी आराम करत असल्यामुळे त्यांना इकडे शनिवार तेली असे संबोधले जात असे. त्याचप्रमाणे साधारण शंभर वर्षांपूर्वी आणखी एक ज्युईश समुदाय मुंबईत राहत होता. ज्युईश समुदाय महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आधीपासून समरस आहे. भारताला काही ज्युईश मान्यवरांनी विशेष योगदान दिले आहे. यामध्ये डेव्हिड ससून यांचा समावेश आहे.डेव्हिड ससून लायब्ररी,डेव्हिड ससून रुग्णालय,भाऊचा धक्का,इत्यादी ज्युईश समुदायाची देण आहे.भारतातील अभिनय क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटविला असून असून  भारतीय कला,शिक्षण आणि सिनेविश्वात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.

इस्राईलमध्ये मराठी बोलणारे लोक हे अधिक प्रमाणात आहेत. इस्राईलमध्ये १९९६ ला  आंतरराष्ट्रीय मराठी परिषद झाली होती.या परिषदेत वरिष्ठ राजकारणी,पत्रकार,कवी इत्यादींनी हिरिरीने सहभाग घेतला होता.इस्राईलमध्ये शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते.त्यामुळे त्याला ‘कृषी पंढरी’ असेही म्हणतात. इस्राईल वापरत असलेले कृषी तंत्रज्ञान महाराष्ट्रातही वापरले जावे. भारताप्रमाणे येथे मुस्लिम,ज्युईश असे अनेक अल्पसंख्याक समुदाय असताना हा देश सौख्याने नांदतो.

श्री. मोशे म्हणाले, जेरुसलेम हे विविध कला आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रेरणास्थान आहे. या महोत्सवामुळे मुंबइकरांना जेरुसलेमचे सांस्कृतिक दर्शन घडण्याबरोबरच भविष्यात सिनेमा, पर्यटन, तंत्रज्ञानाची दालने खुली होणार आहेत. याशिवाय संगीत, पाककला अणि नृत्य क्षेत्रात देशांमधील कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. या महोत्सवामुळे इस्त्राईल आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचा मेळ होणार आहे.

दोन्ही शहरांच्या संस्कृतीचे दर्शन

जेरुसलेम-मुंबई महोत्सवात दोन्ही शहरांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन या महोत्सवाला उपस्थित राहणाऱ्यांना होणार आहे. जेरुसलेम-मुंबई महोत्सव उद्या सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहे.

रसिकांना फ्यूजन रेसिपी चाखायला मिळणार

या महोत्सवात भारतीय शेफ अमनिंदर संधू आणि इस्त्राइली शेफ इलान गरुसी यांची फ्यूजन रेसिपी रसिकांना चाखायला मिळणार आहे. कथ्थक नृत्यांगना सोनिया परचुरे यांचे कथ्थक सादरीकरण आणि ‘द मोसाद’ हा धमाल विनोदी चित्रपट या महोत्सवात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.