नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली सध्याची सत्ताधारी युती ही अनैसर्गिक आणि अनैतिक आहे अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डडा यांनी केली आहे. ते नवी मुंबईत नेरूळ इथं महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या अधिवेशनात बोलत होते.

भाजपा कार्यकर्त्यांनी आता पुढच्या निवडणुकीसाठी जोमाने काम सुरू करावे राज्यातली पुढली निवडणूक रचनात्मक असेल ती स्वबळावर लढू आणि त्या निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केंद्रीय मंत्री पियुष गोयल हेही उपस्थित होते.

या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या भाषणाने झाला. राज्यातलं सरकार पाडायची आम्हाला गरज नाही. तुमच्यात हिम्मत असेल तर जनादेशासाठी निवडणूक लावून दाखवा आम्ही एकटे असलो तरी तुम्हाला पुरून उरु असा इशारा फडनवीस यांनी यावेळी दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येत भव्य राम मंदिराचं निर्माण होणार आहे.

यावरुन आता काहीजण अयोध्येला जायची भाषा करत आहेत. मात्र त्यांनी अयोध्येला नक्की जावे जेणेकरुन त्यांचं खरं हिंदुत्वाचं रक्त जागे होईल असा टोला फडनवीस यांनी लगावला. भीमा कोरेगाव नंतर अर्बन माओवादी समोर आला असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेऊन या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवायचा निर्णय घेतल्याबद्दल फडनवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. मात्र चौकशीतून सत्य बाहेर येईल याची शरद पवारांना भीती आहे असं ते म्हणाले.