नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्स मध्ये मनिला इथे सुरू असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाला अखेर कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत भारताला इंडोनेशियाने आज ३-२ असे हरवले.

या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झालेले दोन्ही संघ, कांस्य पदकाचे मानकरी ठरतात. एकेरीच्या तीन सामन्यांपैकी एक सामना भारताने गमावला, तर दोन जिंकून अंतिम फेरीत जायच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र दुहेरीतले दोन्ही सामने गमावल्यामुळे भारताला अखेर हार पत्करावी लागली.

पहिल्या सामन्यात पहिला गेम ६-२१ असा गमावल्यानंतर, दुखापतीमुळे बी साईप्रणीतने माघार घेतली. दुसऱ्या सामन्यात लक्ष्य सेनने गिंटींग विरुद्ध, तर तिसऱ्या सामन्यात शुभंकर डे ने जोनाथन ख्रिस्टी विरुद्ध सरशी साधली. मात्र अर्जुन-धृव आणि लक्ष्य सेन- चिराग शेट्टी या जोड्या दुहेरीत पराभूत झाल्या.