पुणे : पुण्यातील प्रसिद्ध 28 बांधकाम व्यावसायिकांना आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी या बांधकाम व्यावसायिकांच्या माहितीवर आधारित सचित्र स्वरुपातील ‘आचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, राज्य अध्यक्ष राजीव पारखी, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक, संचालक श्रीराम पवार, सकाळ समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव तसेच नामवंत उद्योजक उपस्थित होते.

रेडी रेकनर चे दर कमी करण्यासाठी प्रयत्नशील बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पुण्यात मूलभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे देशातील सर्व भागातील व सर्व क्षेत्रातील व्यक्तींच्या आकर्षणाचे शहर पुणे बनले आहे. पुण्यातील बांधकामांची संख्या वाढत असून दर्जेदार बांधकामे करण्याचे श्रेय बांधकाम व्यावसायिकांचे आहे. गौण खनिज उत्खनन, मुद्रांक शुल्क तसेच बांधकाम व्यावसायिकांचे अन्य प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. त्याचबरोबर रेडी रेकनरचे दर कमी करण्यासाठीही  प्रयत्न केले जातील, असे श्री. थोरात यांनी सांगितले.

पाण्याच्या पुनर्वापराचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत जयंत पाटील

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, पुणे शहराची वाढ झपाट्याने होत असून शहराची कल्पकतेने वाढ होण्यात बांधकाम व्यावसायिकांचे मोलाचे योगदान आहे. सध्या नागरी वस्त्यांचे प्रमाण वाढत असून त्याप्रमाणात पाण्याचा वापर वाढत आहे. अशावेळी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करायला हवा. पाण्याच्या मर्यादित वापरावर उपाय म्हणून बांधकाम व्यावसायिकांनी घर खरेदीदारांना प्री-पेड मीटर बसवून द्यावे. त्याचबरोबर पाण्याचा पुनर्वापर होणे आवश्यक असून यासाठी क्रेडाई ने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन पाणी पुनर्वापराचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी राजीव पारीख यांनी मनोगतातून बांधकाम व्यावसायिक यांचे प्रश्न मांडले. प्रास्ताविक सकाळ माध्यम समूहाचे संपादक, संचालक श्रीराम पवार यांनी केले. आभार सरव्यवस्थापक शैलेश पाटील यांनी मानले. यावेळी विविध बांधकाम समूहाचे नामवंत व्यावसायिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.