मुंबई : पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसंदर्भात तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आढावा बैठक झाली.

यावेळी पशुसंवर्धन सचिव अनुप कुमार, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सहसचिव माणिक गुट्टे  उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले म्हणाले, विदर्भातील पशुधनाच्या उत्तम पोषणासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. विदर्भातील पशुधनाला  रोगप्रतिबंधक लसीकरण,गुणवत्तापूर्ण औषधे वेळेत देण्यात यावीत. बेरड वळूंचे खच्चीकरण, गायी-म्हशी मधील वंध्यत्व निदान व उपचार तसेच गोचिड निर्मूलन कृत्रिम रेतनाद्वारे गायी-म्हशींच्या अनुवंशिक सुधारणा घडून आणण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांनी गांभीर्याने काम करावे,  असे त्यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागांतर्गत भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अधिकारी-कर्मचारी यांची सुरू असलेली भरती प्रक्रिया वेगात पूर्ण करून नवीन अधिकारी-कर्मचारी यांची भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील रिक्त पदावर नियुक्ती करावी, असेही श्री पटोले यांनी यावेळी सांगितले.