अनुराधा पाटील यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई : मराठी भाषा ही वीरांची भाषा आहे. तिला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे, ती शतकानुशतके टिकून राहील. मराठी भाषेतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.ठाकरे बोलत होते.

यावेळी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहूल नार्वेकर, मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, दहावीपर्यंत मराठी भाषा सर्व शाळांमधून अनिवार्य करण्यासाठीचा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झाला आहे.  हा कायदा माझ्या कालावधीत होत आहे, हे माझे भाग्य. लहानपणापासून साद घालणारे अंगाईगीत, नंतर भावगीत, युद्धभूमीवरील समरगीत, शाहिरांच्या रुपाने अंगात वीरश्री संचारणारा पोवाडा या सर्वांमुळे मराठी समृद्ध आहे. हे अक्षरधन पुढच्या पिढ्यांना देत राहावे. मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा भावी पिढीसाठी जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

परप्रांतियांनीदेखील ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा आत्मसात करावी आणि त्याचा वापर करावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन  राज्य शासनाकडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या प्रकाशन संस्थेस ‘श्री.पु.भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.

निवड समितीने यावर्षीच्या ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी’ ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांची तसेच श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशन, पुणे या संस्थेची निवड केली.

मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस ‘भाषा संवर्धन पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. त्यानुसार या वर्षी डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारासाठी अनुक्रमे प्रा.आर.विवेकानंद गोपाळ व श्री.अनिल गोरे यांची निवड करण्यात आली. साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीकरिता 35 वाङ्मय पुरस्कार विजेते या सर्व साहित्यिकांचा मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

मराठी भाषेचा प्रवास दर्शविणारा आणि मराठी भाषेची सौंदर्यस्थळे मांडणारा सांस्कृतिक कार्यक्रम ‘प्रवास आणि प्रवाह’  हा यावेळी सादर करण्यात आला.

मराठी भाषा अक्षर संपत्ती

स्थानिय लोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे म्हणाले, संपत्ती म्हणजे पैसा, जमीन, घर, त्याचप्रमाणे मराठी भाषा सुद्धा अक्षरधन आहे. मराठी भाषा ही भक्तीची भाषा असून तिची आपण मनापासून भक्ती केली पाहिजे. मराठी अभिजात भाषा झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले. मरिन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित या कार्यक्रमास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार गजानन किर्तीकर, खासदार अनिल देसाई, ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आदी उपस्थित होते. यावेळी ‘अभिजात मराठी’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.