मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय ऊसतोड व वीटभट्टी महिला मजुरांना शेळीपालन प्रकल्पाकरिता नवीन स्वतंत्र योजना राबविणार असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मंत्रालयात आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय ऊसतोड व वीटभट्टी महिला मजूर यांना शेळीपालन प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्याकरिता आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेमध्ये मागासवर्गीय ऊसतोड मजूर लाभार्थ्यांची निवड ही मर्यादित असल्याने अनेक लाभार्थी वंचित राहतात, याकरिता  सामाजिक न्याय व विशेष सहाय  विभागाच्या वतीने स्वतंत्र महिला बचत गटांकरिता नवीन योजना राबवून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत स्वतंत्रपणे राबविण्यात येणारी ही योजना पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखाली आणि सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून राबविण्यात येणार आहे. क्षेत्रीय स्तरावर पशुधन अधिकारी हे काम पाहतील. पशुसंवर्धन विभाग आणि सामाजिक न्याय विभाग  संयुक्तपणे लाभार्थ्यांची निवड करतील असे सांगून श्री मुंडे म्हणाले, ही योजना सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहसचिव माणिक गुट्टे, दि.रा.डिंगळे उपस्थित होते.