नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातल्या कुशल तरुणांना लाभ मिळावा ह्या हेतूने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने व्यावसायिक वाहन चालकांच्या नोकरीसाठीची किमान शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्याचानिर्णय घेतला आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 च्या नियम 8 अन्वये, मोटार वाहनचालक किमान आठवी इयत्ता उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.मात्र देशात, विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, ग्रामीण भागातील लोकांना औपाचारिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अशा नोक-यांपासून वंचित राहावे लागते.ह्या पार्श्वभूमीवर, हरयाणा सरकारने केलेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. वाहन चालक असण्यासाठी शालेय शिक्षणापेक्षा कौशल्याची गरज असते. मात्र, शैक्षणिक पात्रता नसल्यामुळे, ह्या तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित रहावे लागते. ही पात्रता अट शिथिल केल्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगार मिळू शकेल. त्याशिवाय, ह्या निर्णयाचा लाभ व्यावसायिक क्षेत्रातील 22 लाख चालकांना मिळेल.
मात्र औपचारिक शिक्षणाची अट शिथिल करतांनाचा सरकारने वाहनचालक प्रशिक्षण आणि कौशल्ये शिकण्यावर भर दिला आहे. ज्याद्वारे सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ह्या युवकांना आता वाहन परवान्यासाठी काठीण्य पातळी असलेली चाचणी द्यावी लागेल. मोटार वाहन कायदा 1988 नुसार, चालकाला वाहतूक नियमाची सर्व चिन्हे वाचता आणि समजता यायला हवीत. तसेच वाहनाची देखभाल, परीक्षण याचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्याने घेतले असायला हवे यावर मंत्रालयाने भर दिला आहे. त्याशिवाय, त्याच्याकडील वाहन कागदपत्रे व्यवस्थित असायला हवीत, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 च्या नियम 8 यामध्ये बदल करणारी अधिसूचना मंत्रालयाकडून लवकरच जारी केली जाईल.