नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश सरकार नॉयडातलं गौतम बुद्ध नगर शहर स्मार्ट शहर म्हणून विकसित करत आहे. हे शहर विकास आणि संधींच्या दृष्टीनं देशातलं आदर्श शहर म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असं उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी गौतम बुद्ध नगरातल्या बहुमजली वाहनतळ प्रकल्पासह, २ हजार ८२१ कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात बनत असलेल्या जेवार विमानतळामुळे इथं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध होतील, असं त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेश राज्य सरकार राज्यातली कायदा आणि सुवस्था अधिक कठोर करण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यादृष्टीनं पोलीस आयुक्त व्यवस्थेची अंमलबजावणी सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली.