मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबत जाणीव जागृती मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे नमुने तपासण्यासाठी अजून एक प्रयोगशाळा औरंगाबाद येथे सुरु करण्यात यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे आज केली.

कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत देशभरातील राज्यांमध्ये सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरिता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी आज सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

यावेळी आरोग्यमंत्र्यांसमवेत राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त अनुपकुमार यादव, संचालक डॉ.अर्चना पाटील, साधना तायडे आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मुंबई विमानतळावर सुरु असलेल्या वैद्यकीय तपासण्यांबाबत समाधान व्यक्त करतानाच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रबोधनाचे काम हाती घ्यावे, असे आवाहन केले.

आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, राज्यात सध्या पुणे येथे राष्ट्रीय विषाणू संस्थेची प्रयोगशाळा असून कोरोनाची व्याप्ती पाहता मुंबई आणि नागपूर येथे चाचणीची सुविधा करण्यात आली आहे. मात्र अजून एक प्रयोगशाळा महाराष्ट्रात सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे ही प्रयोगशाळा सुरु करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले.

आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी राज्यात सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडिया या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सार्वजनिक उत्सव, यात्रा यांच्या आयोजनाबाबत नागरिकांशी चर्चा करुन त्यांचे स्वरुप मर्यादित ठेवण्याबाबत आवाहन केले जात आहे.