नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुणे येथील रश्मी उर्ध्वरेषे यांना ‘नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमीत्त राष्ट्रपतीभवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ‘नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार-2019’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती ईराणी, राज्यमंत्री देबाश्री चौधरी, केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारीया यावेळी उपस्थित होते.
महिलांच्या सक्षमीकरणात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील 16 महिला व संस्थाना यावेळी नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून रश्मी उर्ध्वरेषे यांना ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.
रश्मी उर्ध्वरेषे, या गेल्या 36 वर्षांपासून ऑटोमोबाईल आणि संशोधन व विकास क्षेत्रात कार्यरत असून केंद्रसरकार संचालित ‘ऑटोमोटिव्ह रीसर्च ऑफ इंडिया’ (एआरएआए) संस्थेच्या वर्ष 2014 पासून त्या अध्यक्ष आहेत. त्यांनी महिला सक्षमीकरण आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात महिलांचा टक्का वाढविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. नुकतेच पुणे जिल्ह्यातील चाकण येथे उभारण्यात आलेल्या हरित वाहतुकीला समर्पित देशातील पहिल्या ‘सेंटर ऑफ एक्सलंस’ च्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. राष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान संग्रहालय उभारण्यातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना मानाच्या नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.