मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांचे शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे 49 कोटी 70 लाख 89 हजार 200 रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी दिली.

श्री. उईके म्हणाले, सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात अपर आयुक्त, नाशिक,ठाणे विभागातील सर्व शासकीय आश्रमशाळा तसेच अमरावती विभागातील काही  प्रकल्पातील शाळा दिनांक 17 जून रोजी सुरु झाल्या असून शाळा सुरु झाल्याच्या दिनांकापासून प्रवेश नूतनीकरण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांवर आयुक्तालयामार्फत डीबीटीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक 21 जून पर्यंत एकूण 1 लाख 3 हजार 194 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 49 कोटी 70 लाख 89 हजार 200 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

यावेळी श्री. उईके म्हणाले, अपर आयुक्त, नागपुर विभागातील संपूर्ण आश्रमशाळा तसेच अमरावती विभागातील न सुरु झालेल्या शाळा या दिनांक 27 जून 2019 रोजी सुरु होणार आहेत. सदर विद्यार्थ्यांची डीबीटी रक्कम विद्यार्थ्यांच्या अग्रीम बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आवश्यक आहे (उदा. 9 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी) ज्या दिवशी प्रवेशित होतील त्या दिवशी त्यांना सदर योजनेचा लाभ हस्तांतरीत करण्यात येईल.

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांना अन्नधान्य, कडधान्य, इतर किराणा माल तसेच शैक्षणिक साहित्य व इतर वस्तुंचा पुरवठा करण्यासंदर्भात दिनांक १० मार्च २०१६ च्या शासन निर्णयान्वये कार्यपद्धती विहीत करण्यात आलेली आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्य व इतर वस्तूंऐवजी थेट रक्कम देण्याबाबतचा निर्णय दि. 7 एप्रिल 2017 रोजीच्या पत्रान्वये घेण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागात एकुण ५०२ शासकीय आश्रमशाळांमध्ये एकूण १ लाख ८१ हजार ९१ विद्यार्थी प्रवेशित आहे.

सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विभागामार्फत थेट लाभ आधार संलग्न बँक खात्यात पाठविण्यात आला. सदर डीबीटी ही योजना यशस्वी करण्यासाठी विभागामार्फत ई-गव्हर्नन्स अंतर्गत प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर प्रणालीमध्ये विद्यार्थ्याचा अर्ज शाळेमार्फत अद्ययावत केला जातो. सदर अर्जाची पडताळणी प्रकल्प कार्यालयामार्फत केली जाते व आयुक्तालयामार्फत मंजूर विद्यार्थ्याच्या खात्यावर डीबीटी प्रणालीमार्फत लाभ दिला जातो. प्रकल्प व शासकीय आश्रमशाळास्तरावरुन विशेष मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांमार्फत बँक खाते उघडण्यात आले. याप्रमाणे कार्यवाही करुन सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात डीबीटी अंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली आहे.