नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डी.एच.एफ.एल.लनं, येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, याच्या कुटुंबियांना ६०० कोटी रुपयांची लाच दिल्याच्या, प्रकरणात केंद्रीय अण्वेषण संस्था अर्थात सी.बी.आय.नं आज सात ठिकाणी छापे टाकले.

राणा याचं घर आणि त्याच्या मुंबईतल्या कार्यालयांमध्ये हे छापे टाकले असल्याचं सी.बी.आय.च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. डी.एच.एफ.एल.ला अर्थसहाय्य करण्यासाठी कपूर यानं डी.एच.एफ.एल.चा प्रवर्तक कपील वाधवान याच्यासोबत घोटाळ्याचा कट रचला असा आरोप सी.बी.आय.नं केला आहे. या सर्व घडामोडी एप्रिल ते जून २०१८ या काळात घडल्या.

आधी येस बँकेनं डी.एच.एफ.एल.मध्ये ३ हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यानंतर वाधवान यानं कपूर याच्या कुटुंबियांना ‘डु ईट’ या कंपनीच्या नावे कर्ज देऊन ६०० कोटी रुपये दिले असं सी.बी.आय.च्या प्रथम माहिती अहवालात म्हटलं आहे. राणा कपूर येत्या अकरा मार्चपर्यंत सक्त वसुली संचालनालयाच्या कोठडीत आहे.