नवी दिल्ली : सोयाबीन पेंड निर्यातीवर 15 टक्के अनुदान मिळावे अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली असून, ही मागणी मान्य झाल्यास महाराष्ट्रासह देशातील सोयाबीन उत्पादक राज्यांना फायदा होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.पटेल यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोरील संकट निवारणासाठी राज्य कृषी मूल्य आयोग करत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.

आयातीत खाद्य तेलावर 10 टक्के विकास कर लावणे आणि सोयाबीनवर लावण्यात येणारा 5 टक्के जीएसटी रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून, केंद्र शासनाच्या सहकार्याने हा विषयही लवकरच मार्गी लागेल, असे श्री.पटेल यांनी सांगितले. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश,राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश या सोयाबीन उत्पादक राज्यांना याचा फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले.