सरकारने काही निर्णय गोंधळात मंजूर केले : चंद्रकांतदादा पाटील
पिंपरी : ‘कोरोना’बाबत काळजी घेतली तर परिस्थिती नियंत्रणात येईल. महाराष्ट्रात पुणे आणि पिंपरी मध्ये पहिले रुग्ण सापडले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुर्व तयारी, सावधनता याबाबत चांगली व्यवस्था केली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रुग्णालयात असलेले संशयीत रुग्ण बरे होऊन घरी गेल्यावर भीती कमी होईल. सर्व नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागात जगजागृती करुन नागरिकांना हॅन्डवॉश उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी येथे केले.
रविवारी (दि. 15) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी महापौर माई ढोरे, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, लेखा समितीचे माजी अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, गटनेते नामदेव ढाके, ज्येष्ठ नेत्या उमा खापरे, महेश कुलकर्णी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, शहर सरचिटणीस अमोल थोरात, विलास मडेगिरी, राजेश पिल्ले, राजू दुर्गे आदी उपस्थित होते.
अधिवेशन संपल्यानंतरची चंद्रकांत पाटील यांची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. झालेल्या अधिवेशनाबाबत त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या या सरकारने सरपंच निवडीचा कायदा, थेट नगराध्यक्षांची निवड हे त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी पूरक निर्णय पटापट गोंधळात मंजूर केले. परंतू नागपूर अधिवेशनापासून आम्ही शेतक-यांच्या नुकसान भरपाई बाबत निर्णय घेण्याची मागणी करीत आहोत ते केले नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीचा घेतलेला निर्णय फसवा आहे. या कर्ज माफीतून गाई, म्हैस, विहीर, पंप व शेती विकासासाठी घेतलेले कर्ज माफ होणार नाही. दोन लाखांच्या वरच्या कर्जाची रक्कम शेतक-यांना भरावी लागणार आहे. नियमित कर्जफेड करणा-यांना पन्नास हजार रुपये मिळणार, यातून सातबारा कोरा होणार नाही.
मागील वर्षी कोल्हापूर, सांगलीमध्ये आलेल्या महापूरात बाधीत झालेल्या नागरिकांना घरे बांधून देणार होते, त्याचे काय झाले? आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन खात्यातील एका प्रकल्पासाठी मुंबईतील प्राईम लोकेशनची आठ हजार कोटींची जागा आणि एक हजार कोटी प्रकल्प खर्च असा नऊ हजार कोटींचा पर्यटन व प्रेक्षणीय स्थळासाठी खर्च होणार आहे. एवढ्या खर्चात राज्यातील सर्व शेतकरी कर्जमुक्त होतील.
मुंबईतील मोकळ्या प्लॉटवर गरजूंना घरे किंवा उद्योग उभारले पाहिजेत. दहा लाख लोकांना रोजगार देणे ही देखील फसवी घोषणा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे येस बॅंकेत अडकलेले पैसे परत मिळविण्यासाठी केंद्रीय पातळीवर पयत्न करु. महापालिकेच्या व नगरपालिकेच्या निवडणूकांसाठी प्रभाग पध्दतच योग्य आहे, असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.