नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रसिद्ध ज्योतिबाचे दर्शन भाविकांना बंद करण्यात आलं आहे. आज पहाटेपासूनच सर्व दरवाजे बंद केले आहेत. ४० वर्षांनंतर प्रथमच मंदिर भाविकांसाठी बंद केले आहे. ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची नाकेबंदी केली आहे.
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा मिरज इथल्या ख्वाजा मिरासाहेब यांच्या उरुसादरम्यान होणाऱ्या अब्दुल करीम खां स्मृती संगीत महोत्सवात जिल्ह्याबाहेरून कलाकार येण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या सहकार्याने या संगीत महोत्सवाची ८६ वर्षांची परंपरा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कोरोना विषाणुचा धोका लक्षात घेऊन शिवप्रतिष्ठानची आजची धर्मवीर स्वागत रॅली रद्द करण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी हा निर्णय घेतला.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेनं आजपासून राणीची बाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
परदेशातून आलेल्या व्यक्तींनी परदेशातून आल्याची माहिती स्वतःहून जिल्हा प्रशासनाला देणं यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंधनकारक केलं आहे.