नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होत असलेले विपरीत परिणाम रोखण्यासाठी अमेरिकेची केंद्रीय बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात कपात करून तो जवळपास शून्यावर आणला आहे.

फेडरल रिझर्व्हनं गेल्या दोन आठवड्यांच्या आतच व्याजदरात दुसऱ्यांदा कपात करून, तो शून्य ते शून्य पूर्णांक २५ दशांश टक्क्यांवर आणला आहे. या आधी २००८ सालच्या जागतिक मंदीच्या काळात अमेरिकेतले व्याजदर इतक्या कमी पातळीवर आले होते.

व्याज दरातल्या कपातीसोबतच बँकेनं मोठ्या प्रमाणात  मालमत्ता खरेदी करण्याचा आणि इतर बँकांना स्वस्त दरात कर्ज देण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

त्यातून या बँकांनी देशातल्या उद्योग व्यवसायांना आणि नागरिकांना मदत करावी असं आवाहनही फेडरल रिझर्व्हनं केलं आहे. हे कौतुकास्पद निर्णय असल्याचं म्हणत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयांचं स्वागत केलं आहे.