नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठवाड्याच्या सर्व जलाशयात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत भरपूर पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी मराठवाड्यातल्या ९६४ जलाशयांमध्ये सुमारे सहा टक्के पाणीसाठा होता. यंदा हे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

राज्याच्या पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीच्या आधारे वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. गेल्यावर्षी या काळात गोदावरीमध्ये शून्य पाणी साठा होता. यंदा हे प्रमाण तब्बल ७३ टक्के आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे ही या जलाशयांमध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं आहे.

राज्यातल्या धरणांमध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचा वापर सिंचनासाठी योग्यरित्या होत नसल्याचं स्पष्ट होत असल्याचं मत जलसंधारण तज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्त केलं आहे. मात्र या पाण्याचा फायदा उसाच्या पीकाला होईल, अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.