पुणे : राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या 373 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 333 व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आली असून काल पर्यंतचे 16 व आजचा एक रुग्ण असे एकूण 17 रुग्ण पॉसिटीव्ह असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. दरम्यान आतापर्यंत आढळलेल्या 17 कोरोना बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, वैद्यकीय चाचणी घेतलेल्या एकूण 373 व्यक्तींपैकी 333 जणांच्या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परदेशातून आलेल्या नागरिकांचे अलगीकरण प्रभावीपणे करण्यात येत असून असे नागरिक बाहेर फिरतानाची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून रुग्णांवरील उपचार, एन 95 मास्क, सर्जिकल मास्क, पीपीई इत्यादी आवश्यक साधनसामुग्रीसाठी विभागातील सर्व जिल्ह्यांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याला 2 कोटी 40 लाख तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 40 लाख रुपयांचा निधी देण्यात येत आहे, अशी माहिती देऊन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, सॅनिटायझर वगैरे वस्तूंचा बेकायदेशीर साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी पीएमपीएमएल बसेस च्या फेऱ्या कमी करण्यात आल्या असून स्थानिक स्तरावरील निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची पथके घरांचा सर्वे करून माहिती गोळा करीत आहेत. आतापर्यंत 26 हजार 315 घरांमधील 1 लाख 17 हजार हून अधिक लोकांचा सर्वे पूर्ण झाला आहे. काल विमानाने आलेल्या 148 प्रवाशांना घरी कॉरंटाईन करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.