नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आठ ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. पुण्यात राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला भेट दिल्यानंतर बोलत होते. यापैकी चार प्रयोगशाळा उद्यापासून, तर औरंगाबाद, धुळे, सोलापूर आदी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये येत्या आठ दिवसांत या प्रयोगशाळा सुरू होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

आजपासून मुंबईच्या केईएम रुग्णालयात ही चाचणी सुरू झाली असून हाफकिन संस्था आणि पुण्याच्या बी.जे. रुग्णालयातही एक-दोन दिवसात या चाचण्या सुरू करण्याची सोय होईल अशी माहिती त्यांनी दिली. आठवडाभरात राज्यात एकूण १० सरकारी रुग्णालये आणि संस्थांमध्ये या चाचण्यांची सुविधा उपलब्ध होईल. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आजपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्याची मुभा खासगी लॅबला दिली आहे. मात्र ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणं असतील त्यांनीच खासगी लॅबमधून या चाचण्या करून घ्यावात असे आवाहन त्यांनी केले.

सध्या राज्यातली सरकारी कार्यालये पूर्ण सुरू असली तरी ५० टक्के कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी कार्यालये चालविण्याचे नियोजन सुरू असल्याचे टोपे म्हणाले. यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून गरज पडल्यास सरकारी कार्यालयात ५० टक्केच कर्मचाऱ्यांना बोलविण्याचा निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. खासगी कंपन्यांनी शक्य असेल त्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून त्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.