मुंबई :  राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिक, व्यापारी, उद्योजक व इतर व्यावसायिकही या संकटाबरोबर लढण्यासाठी सज्ज होऊन आपले योगदान देत आहेत. जीवनावश्यक गोष्टी जरी बंद नाही झाल्या तरीही या आवश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर नक्कीच परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने पुढील 2 महिन्याच्या जीवनावश्यक वस्तू नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून ह्याच महिन्यात उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश विधान परिषदेचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनास दिले.

दोन महिन्यांच्या जीवनावश्यक वस्तू ह्याच महिन्यात उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने  तत्काळ दखल घेतली असून या बाबत आजच आदेश काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.