पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने शनिवारपासून पुढील आदेश येईपर्यंत एमआयडीसीतील सर्व लघुउद्योग बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार बंदचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शनिवारीपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये 12 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. उद्योगनगरीतील कामगार, अधिकारी व उद्योजक यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून राज्य सरकारने पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड शहरात जीवनावश्यक सुविधा वगळून सर्व उद्योग धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील बंद करण्याचे आवाहन केले होते.
या पार्श्वभूमीवर शनिवारी एमआयडीसीच्या पुणे कार्यालयात उद्योजकांची बैठक झाली. उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हद्गल, संजीवकुमार देशमुख, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक विजय खळदकर, बशीरभाई तरासगार, शासकिय अधिकारी, औद्योगिक संघटनेचे प्रतिनिधी, मोठ्या कंपनीचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीमध्ये शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत सर्व औद्योगिक आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व उद्योजकांनी उद्योग बंद ठेवण्याच्या सरकारी आदेशाचे पालन करावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सहाय्य करावे असे आवाहन, बेलसरे यांनी केले आहे .