नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

हा प्रसार रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी वार्ताहर परिषदेत आज नवी दिल्लीत दिली. कोरोनाची लागण झालेल्या देशभरातल्या विविध राज्यांमधल्या ७५ जिल्ह्यांमधे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करायचे निर्देश केंद्रानं राज्य सरकारला दिले आहेत.

या जिल्ह्यांमधे लखनऊ, गाझियाबाद, आग्रा, वाराणसी, कोलकाता, डेहराडून, जयपूर, चेन्नई, पुणे, मुंबई, नागपूर, तिरुअनंतपुरम, बेंगळुरू, श्रीनगर जम्मु, अहमदाबाद, गांधीनगर, बडोदा, दिल्ली आणि चंदीगड या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या जिल्ह्यांमधे जाणा-या सर्व लोकल आणि मेट्रोसेवा तसंच सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था ३१ मार्चपर्यंत बेद ठेवायचे निर्देश दिले आहेत. सुमारे १७ हजार संशयित रुग्णांची याआधीच कोरोनासाठी चाचणी केली असून देशात एका आठवड्यात सुमारे ६० हजार चाचण्या करायची क्षमता असल्याचंही ते म्हणाले.