नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी लवकरच आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

त्यांनी आज प्राप्तीकर, वस्तू आणि सेवाकर तसंच सीमाशुल्क संदर्भातल्या परताव्यांसाठी विविध सवलती जाहीर केल्या. त्यानुसार आर्थिक वर्ष २०१८-२०१९साठी आयकर परतावा भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविली आहे. आर्थिक वर्ष २०१८-२०१९चा प्राप्तीकर उशिरा भरण्यासाठी व्याजदरावर ३ टक्क्याची सूट देऊन ९ टक्के दराने व्याजदर आकारला जाणार आहे.

आधार-पॅन जोडणीची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणाची अर्थमंत्र्यांनी केली. याशिवाय विवाद से विश्वास योजना ३० जून २०२० वाढविली असून यासाठी १० टक्के अतिरीक्त शुल्क लादणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मार्च, एप्रिल, मे २०२०चा वस्तु आणि सेवाकर परतावा भरण्यासाठी ३० जून २०२० मुदतवाढ देण्यात आली असून सबका विश्वास योजनेची मुदत ३० जूनपर्यंत वाढविली आहे.

सीमा शुल्क संदर्भात विविध परवानग्या लवकर मिळाव्यात यासाठी ३० जूनपर्यंत २४ तास सीमा शुल्क परवाने मिळत राहतील याची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली.