पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे बुधवार दि. २६ व गुरुवार दि. २७ जून २०१९ या कालावधीत कै.सदाशिव बहिरवाडे क्रिडांगण, शाहुनगर, चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ बुधवार दि. २६ जून २०१९ रोजी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
बुधवार दि. २६ जून २०१९ रोजी सकाळी १० वाजता के.एस.बी. चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता कै. सदाशिव बहिरवाडे क्रिडांगणात महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते प्रबोधन पर्वाचे उद्द्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती राहणार असून खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे व आमदार गौतम चाबूकस्वार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. त्यांच्यासह उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, पि.चि.नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमित गोरखे, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, तसेच विविध समिती सभापती व सर्व नगरसदस्य व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ६.०० वाजता कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध शाहीर रंगराव पाटील हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन व कार्य यावर आधारित शाहीरी सादर करतील. रात्री ८.०० वाजता ख्यातनाम सिने अभिनेते राहुल सोलापूरकर निर्मित अग्निदिव्य हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित नाटक सादर होणार आहे.
गुरुवार दि. २७ जून २०१९ रोजी कोल्हापूर येथील मिलिंद सावंत आणि त्यांचे सहकारी मर्दानी खेळ सादर करणार आहेत. त्यामध्ये प्राचीन काळातील तलवार, दांडपट्टा आदि शस्त्रांची माहिती व प्रात्यक्षिके सादर होणार आहे.
या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले आहे.