नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाला रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुण्याचे चाकरमानी गावागावात पोचल्यानं गावकरी सतर्क झाले आहेत. त्यामुळे गावात नव्याने येणाऱ्यांची नोंद करुन मुंबई पुणे इथल्या चाकरमान्यांना आरोग्य तपासणीसाठी पाठविण्यात पुढाकार घेतला जात आहे.

दोडामार्ग तालुक्यात कर्नाटककडे जाणारी वाहतूक रोखण्यासाठी मांगेलीत, तर कोल्हापूर-बेळगावकडे ये जा करणारी वाहन रोखण्यासाठी वीजघर इथले मार्ग बंद करण्यात आले आहेत. सर्वच ठिकाणी स्वयंसेवक तैनात असून येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करुन त्यांना प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांनी सुरक्षित अंतर राखावं यासाठी किराणा आणि औषधांच्या दुकानां समोर चौकोन आखण्यात आले आहेत.

मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी इथं नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या वतीने या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सावंतवाडी शहरात नगर परिषदेमार्फत वाडीवाडीवर भाजीची दुकानं सुरु करण्यात आली आहेत. कुडाळ शहरात मात्र आज सकाळी लोकांनी बाजारपेठेतून गर्दी केली होती. गॅस सिलिंडर नेण्यासाठी कणकवली आणि कुडाळमध्ये झुंबड उडाली होती.