नवी दिल्‍ली : कोविड-19 जागतिक साथीच्या रोगामुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या आज तिसऱ्या दिवशी, भारतीय रेल्वे आपल्या मालवाहतूक सेवेच्या माध्यमातून देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सर्व राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती असताना, देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ नये याची खात्री देण्यासाठी रेल्वेची विविध माल गोदाम, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयात भारतीय रेल्वेचे कर्मचारी चोवीस तास कार्यरत आहेत.

पुरवठा साखळी कार्यरत राहण्यासाठी, काल 27 मार्च 2020 रोजी 34648 वाघिणींनी (माल डब्बे) पुरवठा करण्यात आला. पुरवठा साखळी कार्यरत राहील हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेने यापैकी जीवनावश्यक वस्तूंच्या 23682 वाघिणी 425 रॅक्समधून आणल्या. गेल्या 5 दिवसांत जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या एकूण वाघीणींची संख्या अंदाजे 1.25 लांखावर पोहोचली आहे.

जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या एकूण 23682 वाघीणींपैकी अन्नधान्य 1576, फळ आणि भाजीपाला 42, साखर 42, मिठ 42, कोळसा 20488 आणि पेट्रोलियम पदार्थ 1492 वाघिणी मधून नेण्यात आले. काल भारतीय रेल्वेने 15 वाघिणी मधून दुधाची वाहतूक देखील केली.

देशभरातील विविध ठिकाणी मालाची चढ-उतार सुलभपणे व्हावी यासाठी गृह मंत्रालयाने माल वाहतुकीवरील निर्बंध हटविले आहेत, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. यामुळे देशभरातील टर्मिनलवर मालाच्या चढ-उतारा संदर्भातील स्थानिक पातळीवरील परवानग्यांमध्ये ताळमेळ आला आहे. लॉकडाऊन कालवधीत पुरवठा साखळी निरंतर कार्यरत राहावी यासाठी भारतीय रेल्वेकडून माल वाहतुकीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.