बारामती : महाराष्ट्र शासनाने निर्देशीत केल्यानुसार छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिनानिमित्त तहसिल कार्यालयाच्या सभागृहामध्ये बारामती तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राहूल कृष्णराव तावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस अजित शंकर शिंदे, सौ.संगिता बाळासाहेब पोमणे, दत्तात्रय तुकाराम लोणकर, विजयकुमार दत्तात्रय देवकाते, उदय धोंडोपंत चावरे, राजेंद्र आप्पासो डोंबाळे, शहाजी मारुती कदम, तसेच लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.तावरे यांनी शासनाने विहीत केलेल्या नियमांनुसार संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे दाखल करताना ती परीपूर्ण असावीत. जेणेकरुन त्यांना बैठकीमध्ये मंजूरी देण्यात येईल. ज्या लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रूटी असतील त्यांनी त्याचे निराकरण करुन पुढील बैठकीमध्ये सादर करावीत. असे सांगितले. संजय गांधी निराधार योजनांचा तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व इतरांना या योजनेविषयी अवगत करावे असे आवाहन केले.
तहसिलसदार पाटील यांनी सामाजिक न्याय योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत बारामतीमध्ये जास्त असल्याचे सांगितले. संजय गांधी निराधार दुर्बल घटक अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना, इंदिरा गांधी निराधार व भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना यासारख्या सामाजिक न्याय योजनांचा लाभ हा लाभार्थ्यांना कायमस्वरुपी मिळत असतो.
त्यामुळे नेमक्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनांची माहिती जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ज्यांनी या योजनांमध्ये लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांनी इतर पात्र लाभार्थ्यांना या योजनांची माहिती द्यावी. शासनाने विहीत केलेल्या निकषांनुसार परिपूर्ण अर्जाना बैठकीत मान्यता देवून त्याचा लाभार्थ्याना फायदा पोहचविण्याकरीता प्रशासनामार्फत करण्यात येणारे कामकाज समाधानकारक असल्याचे सांगितले.
या सभेमध्ये एकूण ७७ अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेचे ४६ प्राप्त अर्जापैकी ४१ मंजूर तर ०५ अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे ३१ प्राप्त अर्जापैकी २७ मंजूर तर ०४ अर्ज नामंजूर करण्यात आले.