पालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये भरारी पथके तपासणी करणार; पालिका अधिकाऱ्यांनी वेगाने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून नगरसेवकांच्या सर्व २२७ प्रभागांमध्ये पालिकेची भरारी पथके आजपासून घराघरांमध्ये तपासणी सुरु करणार आहेत. राज्यांतील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने मुंबईमधील लोकसंख्या, दाट लोकवस्ती तसेच विषाणू प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेस हे निर्देश दिले. काल सायंकाळी त्यांनी महापालिकेच्या उपायुक्त तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली व महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
यावेळी आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पालिका करीत असलेल्या विविध उपाययोजनांची तसेच पुढील नियोजनाच्या अंमलबजावणीची माहिती दिली. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थिती फैलाव थांबवा
वरळी कोळीवाड्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाड्याचा परिसर दूषित क्षेत्र म्हणून घोषित केला असून तेथील नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध आले आहेत. या घटनेनंतर अशाच प्रकारे मुंबईत साथ फैलावून आणखी दूषित क्षेत्र निर्माण झाल्यास आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाला हा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. मुंबई हे देशातील एक प्रमुख शहर असून आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात राहिली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, तातडीने भरारी पथके सक्रिय करून तपासणीस सुरुवात झाली पाहिजे.
या पथकांकडे एक वाहन तसेच पालिका अधिकारी-कर्मचारी, पोलीस तसेच महसूल विभागाचा कर्मचारी व वैद्यकीय सहायक असेल. हे पथक कोरोनाविषयक रुग्ण, त्यांच्या संपर्कात आलेले लोक यांची माहिती प्रत्यक्ष जाऊन घेतील तसेच ताप. सर्दी, न्यूमोनिया सदृश आजार असलेले लोकदेखील शोधतील व त्यांच्या तपासणीसाठी तातडीने पुढील कार्यवाही करतील.
प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषधांची दुकाने सुरु ठेवली मात्र याचा गैरफायदा घेऊन लोक फिरायला निघाल्यासारखे निघत असतील तर ही सोय बंद करण्याचा कठोर निर्णय प्रसंगी घ्यावा लागेल.
कोरोना रोखायचाच आहे हे आव्हान आपण पेलले असून राज्य सरकार पालिकेच्या संपूर्णपणे पाठीशी आहे. उपायुक्त, तसेच प्रभागांशी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियमित कामे आणि कोरोना नियंत्रण काम यात व्यवस्थित नियोजन करावे. कामाचे नीट वाटप करावे. स्वत:वरचे इतर कामांचे ओझे कमी करून कोरोनावर लक्ष केंद्रित करा.
खासगी डॉक्टर्सची मदत घ्या
आपापल्या वॉर्डमधल्या खासगी डॉक्टर्सना शोधून त्यांना त्यांचे दवाखाने सुरु करण्याची विनंती करा, त्यांना आवश्यक ते मास्क द्या पण नियमित रुग्ण तपासण्यास सुरुवात झाली तर शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल.
स्वच्छतेकडे लक्ष अत्यावश्यक
विशेषत: वस्त्यांमधून स्वच्छतागृहे स्वच्छ राहतील, त्या ठिकाणी आवश्यक फवारणी होत राहील. हात धुवायला साबण राहतील हे पाहा. साथीचा आजार वस्त्यांमध्ये पसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राहिलीच पाहिजे.
गर्दी कमी करा
अजूनही काही बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी दिसते. तेथील भाजीबाजारांमध्ये शिस्त आणा. त्यांना गल्ल्या किंवा तारखा वाटून द्या. प्रसंगी बाजार मोकळ्या जागांवर स्थलांतरित करा अशा सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
अति धोका गटातील नागरिकांवर लक्ष द्या
आपल्याकडे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये २० ते ४० गटातील रुग्ण आहेत परंतु खऱ्या अर्थाने जीवाचा धोका हा वृद्ध नागरिकांना असतो हे लक्षात घेऊन अशा ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रित करा. ही साथ ज्येष्ठ नागरिक वयोगटात पसरली तर नियंत्रणासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.
१२ मार्च पासून २३ मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती अधिक बारकाईने तपासा आणि त्यांना क्वारंटाईन कसे करता येईल ते पहा. अद्यापही काही व्यक्ती सापडू शकलेल्या नसतील त्या कोणत्याही परिस्थितीत शोधा. तंत्रज्ञानाची मदत घ्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सोसायट्यांनी फवारणी करू नये
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो, त्यामुळे अशी फवारणी करू नये आणि करायची असल्यास संबंधित महानगरपालिका प्रत्यक्ष त्या भागाची तपासणी करून आवश्यकता भासल्यास स्वतः फवारणी करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जलद प्रतिसाद द्या
मुंबई महापालिकेचे कर्मचारी कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात, अनेक गंभीर संकटात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे आपल्याला अधिक जलदपणे या संकटात काम करायचे आहे. आपले रिपोर्ट्स तातडीने मुख्यालयात येतील हे पाहिले पाहिजे म्हणजे मुकाबला करण्यासाठी लगेच आवश्यक ते नियोजन करता येईल असेही ते म्हणाले.
यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांनीदेखील पालिका अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून कोरोनाचा मुकाबला करावा याविषयी मार्गदर्शन केले . सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की, साथ रोगात तो कमी कालावधीत दुपटीने वाढणे रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. प्रधान सचिव श्री. चहल यांनीदेखील परदेशांतून आलेले प्रवासी व त्यांचे जास्तीत जास्त संपर्क तातडीने शोधण्यास सांगितले.