पिंपरी : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी कोरोनाच्या लढ्यासाठी 50 लाखांची मदत केली आहे. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ खात्यामध्ये खासदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्याचे पत्र खासदार बारणे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिले.

संपूर्ण जगभरात कोरण्याचा प्रादुर्भाव झाला असून मोठे संकट ओढवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस देशभरात लॉकडाऊन पुकारला आहे. या संकटावर मात करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मदत केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकार घेत असलेल्या आर्थिक तरतुदीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ कोव्हिड 19 खात्यामध्ये खासदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी बारणे यांनी जमा केला आहे.

खासदार बारणे म्हणाले, ‘देशावरील हे संकट मोठे आहे. प्रत्येकाने आपापल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोणीही घराबाहेर पडू नये. सर्वांनी घरी राहून सरकारला सहकार्य करावे. सरकारच्या सूचनांचे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. वारंवार साबनाने हात धुवावेत’.