नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना चाचण्यांची सुविधा महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज साडेपाच हजार  चाचण्या करता येतील,  अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात आतापर्यंत ६ हजार ३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून ५ हजार ९११ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचं  त्यांनी सांगितलं.
कोरानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवण्यासाठी सुरूवातीपासूनच  केंद्र शासनाकडे सातत्यानं  पाठपुरावा करण्यात आला. राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारनं तातडीनं  शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली .
सध्या राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज २ हजार ३०० चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होईल, असं त्यांनी सांगितलं.
राज्यात कोरोनाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी साधनसामग्री उपलब्ध असल्याचं  आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.  राज्यात सध्या एन ९५ मास्क दीड लाख  उपलब्ध असून सुमारे ३५ हजार पीपीई कीटस् तर २१ लाख ७० हजार ट्रीपल लेअर मास्क उपलब्ध आहेत. अजुन साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत, असं टोपे यांनी सांगितलं.