नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणु संसर्गा मुळे झालेल्या लॉक डाऊनच्या परिस्थितीत राज्यातला कुठलाही स्थलांतरित मजूर अथवा गरीब भुकेलेला राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल अशी ग्वाही, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यांनी आज मुंबईत भायखळ्यातल्या रिचर्डसन क्रुडास कंपनीच्या आवारात उभारलेल्या निवारा छावण्यांना भेट देऊन स्थलांतरित मजुरांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस करुन  त्यांना अन्नधान्याचं वाटप केलं. त्यावेळी ते बोलत होते.
आजची आपली भेट म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात व्यक्त केलेल्या सरकारच्या बांधिलकीचाच एक भाग आहे असही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राज्यात सध्या असलेले आदिवासी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, गरीब, हे कुठल्या राज्यातले आहेत याचा विचार न करता, सरकार त्यांचे हाल होऊ देणार नाही, त्या दृष्टीनं अशा सर्व जणांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ मदत करावी असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.