‘फिटनेस’, परवाना,वाहन चालन परवाना, नोंदणी आणि इतर मोटर वाहन कागदपत्रांच्या वैधतेलाही मुदतवाढ
नवी दिल्ली : ज्या नागरिकांचा वाहन चालन परवाना, इतर परवाने आणि वाहन नोंदणी यांची मुदत 1 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे, त्यांच्या परवान्यांच्या वैधतेला दि. 30 जून 2020पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. कोरोना साथीचा विचार करून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या सल्ल्यानुसार मंत्रालयाने परवाना संपत असलेल्या सर्व वाहन विषयक कागदपत्रांच्या वैधतेला मुदतवाढ दिली आहे.
संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे सर्व शासकीय वाहतूक परवाने कार्यालये बंद आहेत. त्यामुळे वाहन विषयक कागदपत्रांच्या वैधतेचे नूतनीकरण करणे नागरिकांना शक्य नाही. सद्यस्थितीची समस्या लक्षात घेवून वाहतूकविषयक सर्व परवान्यांच्या वैधतेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
या कागदपत्रांमध्ये सर्व प्रकारचे ‘फिटनेस’प्रमाणपत्र, वाहन चालन परवाना, वाहनांची नोंदणी त्याचबरोबर मोटार वाहन नियमाअंतर्गत येत असलेल्या इतर सर्व कागदपत्रांचा समावेश आहे.
वाहतूकविषयक कागदपत्रांच्या वैधतेला दिलेली मुदतवाढ लक्षात घेवून सर्व राज्यांनी कृती करावी आणि अत्यावश्यक सेवा देणा-या वाहनांची तसेच नागरिकांची,संस्थांची कागदपत्रांच्या वैधतेवरून अडवणूक करू नये. त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये,याची काळजी घ्यावी, असे आवाहन रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे.