नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात झालेल्या कोरोना उद्रेकाचा सामना करण्यासाठी औषधांचा तुटवडा अजिबात भासणार नाही असं केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानं आज स्पष्टं केलं. चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाल्यापासूनच आम्ही देशातल्या औषधनिर्मितीवर सातत्यानं आणि बारकाईनं लक्ष ठेवून आहोत, तसंच संचारबंदीच्या काळातही औषधं आणि वैद्यकीय उपकरणांची निर्मिती विनाअडथळा कशी सुरू राहील याचीही काळजी घेत आहोत असही मंत्रालयानं सांगितलं आहे.
औषधं आणि वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, वितरण आणि पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याकडेही आम्ही, केंद्र सरकारचे इतर संबंधित विभाग, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्यानं कटाक्षानं लक्ष ठेवून आहोत असंही विभागानं स्पष्टं केलं आहे. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी, मालवाहतूक आणि इतर संबंधित सुविधांमध्ये समन्वय राखण्याकरता, मंत्रालयानं केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारला असून केंद्रीय औषध मूल्य नियामक प्राधिकरणानं हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केला आहे.
1800111255 हा हेल्पलाईन क्रमांक जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध राहणार आहे. नियंत्रण कक्ष मात्र सकाळी चार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यरत राहील, या नियंत्रण कक्षाशी 011-23389840 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असं रसायन आणि खत विभागानं कळवलं आहे.