नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारनं दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून, दिल्ली पोलिसांनी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच नव्या व्हिसा नियमांचं उल्लंघन करून प्रवास केलेल्याविरुद्ध, केंद्र सरकार कठोर कारवाई करणार आहे. अशा लोकांना काळ्या यादीत टाकलं जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांवर नजर ठेवून या सर्वांची चाचणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. यात नागपुरातले ५४ जण सहभागी झाले होते आणि त्यांचे विलगीकरण करण्यात आल्याची माहिती नागपुरचे पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली आहे.

या धार्मिक कार्यक्रमातून अहमदनगर जिल्ह्यात 46 जण आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. यामध्ये २९ परदेशी व्यक्ती आणि १७ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. यापैकी २९ परदेशी आणि ६ भारतीयांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली आहे. तर उर्वरित नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या २९ परदेशी नागरिकांपैकी दोघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. इतरांचे अहवाल अजून आलेले नाही.

दिल्लीतल्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नाशिक जिल्ह्यातल्या तब्बल ३२ व्यक्तींची प्रशासनाने खात्री पटविली आहे. त्यांच्यातल्या काहींना घरांमध्ये तर काहींना आरोग्य विभागाच्या कक्षात वेगळे ठेवले जात आहे.

यामध्ये सहभागी झालेल्या अमरावती जिल्ह्यातल्या सात जणांची तत्काळ तपासणी करण्यात आली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. याठिकाणी जाऊन आलेला एक व्यक्ती तेलंगणामधून चंद्रपुरातल्या राजुऱ्यात आला होता. त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातले ११ लोक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात वर्धा जिल्ह्यातले आठ जण सहभागी झाले होते. यापैकी एक व्यक्ती आर्वीमध्ये आला असून त्याची व त्याच्या कुटुंबांतल्या सदस्यांची चाचणी करण्यात आली असून त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे. इतर सात जण अजून वर्ध्यात पोहोचलेले नाहीत.

यवतमाळमधले १२ जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यातले ५ जण जिल्ह्यात परतले असून त्यांना वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. इतर ७ जणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातले सात नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यापैकी फक्त तीनच जण उस्मानाबाद जिल्ह्यात परतले आहेत. या तिघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.या कार्यक्रमात नवी मुंबईतले १५ जण सहभागी झाले होते. मात्र त्यातले १२ जण अजून दिल्लीत असल्याचे आमच्या वार्ताहराने कळविले आहे.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जालन्यातल्या ५ नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.