पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर वैद्यकीय सेवा सुविधांच्या अनुषंगाने येथील विविध हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी संचालक डॉ. सुभाष साळुंखे तसेच नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. डी.बी.कदम उपस्थित होते.
डॉक्टर व परिचारीका कोरोना बाधीत रुग्णांना चांगल्याप्रकारे सेवा देत असल्याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी या बैठकीत समाधान व्यक्त केले. डॉक्टरांनी यापुढेही आवश्यक ती खबरदारी घेऊन कोरोना बाधित रुग्णांवर योग्य ते उपचार करणे गरजेचे आहे, असे सांगितले. कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून डॉक्टरांचा सहभाग महत्वाचा आहे, असे सांगून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात खाजगी हॉस्पिटलच्यावतीने देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटल मध्ये करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच वैद्यकीय सुविधा देतांना डॉक्टरांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.