सातारा : कोरोना (कोविड-१९) संसर्गामुळे २३ मार्च पासून महाराष्ट्र लॉक डाऊन झाला. अत्यावश्यक सेवा सोडून सगळे दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आले. सुरुवातीच्या २३, २४ ला  काय काय बंद आहे याबाबत थोडा गैरसमज झाल्यामुळे सगळीकडेच गर्दी वाढली. त्यांनतर जिल्हा प्रशासानाने वेळीच या स्थितीवर नियंत्रण आणून भाजीपाला ही जीवनाश्यक गोष्ट आहे,  ती जनतेपर्यंत पोहचायलाच हवी  मात्र संसर्ग वाढू नये म्हणून किमान तीन फुटाचे अंतर ठेवून (सोशल डिस्टन्स) भाजीपाला खरेदी करावा असे आवाहन केले.  सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपजिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांची जिल्ह्यातील   सातारा, जावली, वाई,  लोणंद, फलटण, दहिवडी, वडूज, कोरेगाव, कराड आणि पाटण या दहा भाजी मार्केट मधून गावोगावी   किरकोळ विक्रेत्यांच्या मदतीने तिथे विकण्यासाठी तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना विकण्याची मुभा दिला. सातारा भाजी मार्केट भर वस्तीत असल्यामुळे अपुऱ्या जागेमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे हे लक्षात येताच जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, सातारा तालुका सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी पुढे होऊन सर्व व्यापाऱ्यांना आणि भाजीपाला थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना सातारा शहरातील शाहू स्टेडियम मध्ये नगर परिषदेच्या सहकार्याने त्यांना जागा आखून दिल्या.  नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या सहकार्याने प्रभागाप्रमाणे किरकोळ विक्रेते नेमले.  त्यामुळे सातारा जिल्ह्यात कोणतीही गडबड न होता सोशल डिस्टन्स ठेवून रोजच्या रोज भाजीपाला विकला जात आहे. नागरिकांच्या घरा पर्यंत कोणतीही गर्दी न करता भाजी जात आहे. त्याचा लेखाजोखा मांडणारा हा लेख.

पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी राज्यातील जनतेला मुबलक असा भाजी-पाला उपलब्ध होण्यासाठी सहकार विभागाच्या माध्यमातून विशेष उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यात मुबलक प्रमाणात भाजी-पाला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येत आहे.

प्रशासनाने मंडईत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना सुरक्षित अंतर ठेवून भाजी-पाला विक्रीची परवानगी देण्यात आली होती. गर्दी होऊ नये यासाठी त्यांना उपलब्ध असलेल्या मोठ्या मैदानांमध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी सुरक्षित अंतर न पाळता भाजी-पाला घेत असल्याचे आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने काही मंडई बंद केल्या असून शहरी भागातील प्रत्येक वॉर्डासाठी नगरपरिषदेतर्फे भाजीपाल्यांच्या विक्रीसाठी स्वतंत्र वाहनांना परवानगी दिली आहे. या भाजी-पाल्याची वाहने हे प्रत्येक वार्डातील प्रत्येक घरासमोर थांबून  सुरक्षित अंतर पाळून भाजी विक्री करीत आहे.

पहाटे सुरु होते अधिकाऱ्यांकडून पाहणी

पहाटे या भाजीपाल्याच्या आणि फळांच्या गाड्या स्टेडियममध्ये यायला सुरुवात होतात. त्यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, सहायक निबंधक बाळासाहेब तावरे तिथे जातीने हजर असतात. उपजिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, नगराध्यक्ष माधवी कदम याही अधून मधून पहाणी करतात. त्यामुळे लोकांच्या घरात आणि पोटात वेगवेगळ्या भाजीच्या रुपात जीवन सत्व  जात आहे. हे सर्व करताना कुठलाही अविर्भाव नाही. ही सेवा आहे, हा भाव त्यांच्या ठायी आहे, हे सर्वात महत्वाचे.

शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल बाजारात आणावा, जिल्हा उपनिबंधक  प्रकाश अष्टेकर यांनी केले आवाहन

सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची नियमित आणि पुरेशी आवक होत असून जीवनावश्यक भाजीपाल्यासाठी जिल्ह्यातील जनतेला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बाजार समिती आवारामध्ये सोशल डिस्टन्स चे पालन करण्याची जबाबदारी संबंधित अडत्या व्यापारी यांच्यावर टाकण्यात आलेली आहे.

सर्वच बाजार समित्यांमध्ये भाजीपाला विक्रीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सातारा शहरातील भाजीपाल्याचे घाऊक विक्री व्यवहार बाजार  समितीमधील कमी जागा विचारात घेऊन स्टेडियमवर हलविण्यात आलेले आहेत. सर्व बाजार घटकांनी बाजारात येताना मास्क चा वापर करावा तसेच गर्दी टाळावी आवारात किरकोळ ग्राहकांनी गर्दी करू नये, त्यांना या बाजारात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलेला आहे.

सर्वसामान्य जनतेसाठी भाजीपाला फिरत्या गाड्यांमधून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची पुरेशी व्यवस्था नगरपालिका व बाजार समिती यांच्या माध्यमातून केलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात  किरकोळ ग्राहकांना खरेदीसाठी सोडण्यात येत नाही ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल बाजारात आणावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकार प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे.

दि. ५ एप्रिल रोजी २ हजार ८६६ क्विंटल, दि.६ एप्रिल रोजी ३ हजार ५० क्विंटल व दि. ७ एप्रिल रोजी २ हजार ८६६ तर ८ एप्रिल रोजी २ हजरी ७१ क्विंटल कांदा, बटाटा, भाजी-पाला व फळे इत्यादी उपलब्ध झाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यातील फळे, भाजीपाला यांचा दि.७ एप्रिल रोजीचा प्रति किलो बाजारभाव पुढीलप्रमाणे : कलिंगड- ५-८ रुपये,  कांदा-१०-१८, बटाटा-१८-२५, लसून-१००-१२०, आले-३५-४५, भेंडी-२०-२५, गवार-३५-४५, टॉमेटो-४-८, मिरची-२५-४०, काकडी-८-१०, वाटाणा-४०-५५ असा आहे.